अभयारण्य...विचारान्चे, अस्तीत्वाचे

Monday, April 19, 2010

किल्ले रायगड - सिध्दार्थ सोष्टे

महाराष्ट्र हा दगडांचा, दुर्गांचा देश म्हणून प्रसिध्द आहे आणि या दूर्गांचा राजा आहे दुर्गदुर्गेश्वर रायगड. ज्याच्या दर्शनानेच तो पाहण्यास आलेल्याचे मन भरुन येते असा हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून १६५६ मध्ये निवडला.

पूर्वी हा किल्ला राजिवटा, नंदादिप, रायरी अशा नावांनी ओळखला जायचा, ४ सप्टेंबर १६५६ रो़जी या किल्ल्याचे रायगड असे नामकरण झाले व जुन १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक या गडावर झाला.

रायगड ही स्वराज्याची राजधानी करण्याचे कारण म्हणजे गडावर विस्तीर्ण असे पठार आहे त्यामुळे राजधानी साठी लागणार्‍या सर्व इमारती येथे बांधणे शक्य होते व अन्नधान्य तसेच पाण्याचीही सोय करता येणे शक्य होते. तसेच मुंबई, पुणे व सातारा ही महत्त्वाची राजकीय केंद्रे किल्ल्यापासुन जवळ्च होती व समुद्र येथून ६५ कि.मी. अंतरावरच होता, मुख्य म्हणजे राजांचा कट्टर शत्रू जंजिर्‍याचा सिद्दी येथून जवळ्च असल्याने त्याच्यावर नजर ठेवणे राजांना शक्य होते.

रायगडाच्या चारही बाजुला असलेल्या सह्याद्रीच्या विविध डोंगरांमुळे रायगडाचे दर्शन त्याच्या जवळ जाईपर्यंत होत नाही व शत्रूला चकमा देणे शक्य होते.

या किल्ल्याचे वर्णन करताना हिंदी कवी भुषण म्हणतो शिवाजीने सर्व किल्ल्यांचा मेरुमणी व वैभवस्थान अशा रायगडास आपले वसतीस्थान केले, या किल्ल्यावरील प्रचंड दरबार व विस्तृत पठार पाहून कुबेरही लाजू लागला हा किल्ला एनढा विशाल आहे की त्यात तिन्ही लोकांचे वैभव आहे, सर्व यवनांना जिंकून राजा शिवाजीने रायगडाला राजधानी केली व जगात यश संपादन केले. आकाशात इतरत्र कोठेच जागा नसल्याने त्रस्त झालेले सुर्य व चंद्र रायगडावर आसरा घेतात. एका कानडी कवितेत रायगडाचे वर्णन भुतलावरचे आश्चर्य गणला जाणारा रायरी असे केले गेले आहे. तसेच टॉमन हा इंग्रजांचा प्रतिनिधी शिवाजी महाराजांस भेटण्यास आला असता अन्नाचा भरपूर साठा असल्यास अल्प शिबंदीत रायगड सर्व जगाशी लढू शकेन असे म्हटले आहे.

जावळी खोर्‍याचा कारभार वतनदार चंद्रराव मोरे प्रथम आदिलशहाकडून पहात होता. अगोदरच आदिलशहाशी फटकून वागणारा चंद्रराव ..... मध्ये निजामशाही नष्ट झाल्यावर तळकोकणावर आपला हक्क सांगू लागला तेव्हा आदिलशहाने अफजलखानाला चंद्रराव मोरेविरुध्द पाठवले तेव्हा चंद्ररावाने शिवाजीमहाराजांची मदत घेतली. पुढे चंद्रराव व महाराजांच्यात संघर्ष झाला व महाराजांनी मोर्‍यांविरुध्द लढाई पुकारुन जावळी खोरे आपल्या ताब्यात घेतले.

महाडहून रायगडला येताना प्रथम पाचाड येथे यावे लागते येथे महाराजांनी राजमाता जिजाबाई यांच्यासाठी वाडा बांधला होता, या वाडयाचे अवशेष आजही येथे दिसून येतात. जिजामातांचे निधन येथेच झाले, जिजाबाईंची छत्री या ठिकाणी आहे.

गड चढणे सुरु झाल्यावर खुबलढा बुरुज लागतो, रक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा हा बुरुज आहे. पुढे गेल्यावर नाना दरवाजा लागतो यानंतर पहारेकर्‍यांचे वसतिस्थान व धान्याचे कोठारांचे अवशेष दृष्टीस पडतात. येथील मस्जिद मोर्चाजवळ मदनशहा नावाच्या साधुची कबर लागते, पुढे काही अंतरावर महादरवाजा लागतो, महादरवाजास दोन मोठे बुरुज आहेत. कमानीच्या दोन्ही बाजूस गंडभेरुडांची छायाचित्र कोरलेली आहेत. या दरवाज्यात उभे राहिले असता सोसाट्याच्या वार्‍याने आपण उडतो की काय अशी भिती वाटल्याशिवाय राहत नाही. पुढे गेल्यावर हत्ती तलाव लागतो याची लांबी ३६ मीटर असुन रुंदी २३ मीटर आहे, हत्ती तलावाच्या थोडया पुढे प्रचंड असा गंगासागर तलाव लागतो, हा तालाव ११० मीटर लांब व ९० मीटर रुंद आहे. आजही गंगासागरमध्ये विपूल पाणी आढळ्ते. गंगासागरपासून पुढे गेल्यावर दोन मनोरे असून सध्या भग्नावस्थेत आहेत. पूर्वी पाच असलेल्या या मनोर्‍यांचे सध्या दोन मजलेच राहिले आहेत. मनोर्‍याच्या बाजूला असलेला जिना आपल्याला बालेकिल्ल्याकडे घेऊन जातो. आत शिरताना लागणार्‍या दरवाज्यास पालखी दरवाजा म्हणतात. या दरवाज्यातून छत्रपती शिवाजी महाराज जात येत असत.

पालखी दरवाज्याच्या पुढे सरळ अंतरावर मेणा दरवाजा लागतो. राजघराण्यातील स्त्रियांना आतबाहेर येण्यासाठी हा दरवाजा होता. मेणादरवाजाच्या मार्गावर उजव्या बाजूस राणिवसा नावाचे सहा वाडे आहेत. हे वाडे महाराजांनी राण्यांसाठी बांधून दिले होते. पालखी दरवाजातून आत शिरल्यावर डाव्या बाजुस राजभवनाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. येथील सिंहासन व नगारखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे ७० मीटर एवढे अंतर असुनदेखील सिंहासनावरुन कितीही हळू बोलले तरीही ते नगारखान्याजवळ ए॓कू येते. नगारखान्याची वास्तू अतिशय भव्य आहे या इमारतीस २९ पायर्‍या आहेत. येथून पूर्वेस राजगड, लिंगाणा व तोरणा व आग्नेयेस प्रतापगड इत्यादी किल्ले दिसून येतात.

नगारखान्याची इमारत ओलांडल्यावर शिर्काई देवाचे मंदिर लागते या मंदिरात अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. येथून पुढे कुशावर्त तालाव लागतो या परिसरात सचिवांच्या वाड्यांचे अवशेष दिसून येतात. येथील बाजारपेठ अतिशय प्रेक्षणीय आहे. या बाजारपेठेत एकुण ४४ दुकाने आहेत, व मध्यभागी चालण्यासाठी रस्ता आहे. बाजारपेठेच्या मध्यभागी असलेल्या एका दुकानावर नागाचे चित्र कोरलेले आहे. बाजारपेठेच्या पुढे हत्तींना बांधण्याची जागा (हत्तीशाळा) आहे. पुर्वेकडे जगदीश्वराचे सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या दारात कासवाची प्रशस्त मूर्ती लागते. गाभाराच्या भिंतीस मारुतीची मूर्ती आहे गाभार्‍यात सध्या कोणतीच मूर्ती नाही. येथील प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर सेवेचे ठाई तत्पर, हिरोजी इटळकर असा शिलालेख आढळ्तो व उजव्या बाजूला संस्कृत भाषेतला शिलालेख आहे. मंदिराच्या पुढे गेल्यावर पूर्वेस महाराजांची समाधी आहे. १९२६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने समाधीचा जिर्णोध्दार झाला. समाधी शेजारी शिवरायांचा लाडका कुत्रा वाघ्याची समाधी आहे. शिवाजी महाराजांच्या चितेस अग्नी देण्यात आला तेव्हा वाघ्यानेही चितेत उडी टाकून बलिदान केले होते.

टकमक टोक हे मुख्य आकर्षण आहे. इतिहासकालातील राजद्रोही फितूरांना येथून खाली ढकलले जायचे आजही ही जागा पाहून ती शिक्षा किती भयानक असेल याची कल्पना येते. समाधीहून पूर्वेकडे सरळ चालत गेल्यास भवानी टोक लागते या टोकाला लागून एक नैसर्गिक गुहा आहे. मात्र येथे जाण्याचा मार्ग थोडा अवघड आहे. येथे भवानी मातेची स्वयंभू मूर्ती आहे.

हिरकणी बुरुज लहानांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांना माहित आहे तो शाळेय पुस्तकातल्या कथेवरुन, पायथ्याला असलेल्या वाडी या गावातील हिरकणी गवळण दुध घेऊन गडावर आली होती. रात्र झाल्यावर गडाचा मुख्य दरवाजा बंद झाला व हिरकणी किल्ल्यातच अडकून पडली. गावात आपले लहानगे बाळ रडत असेल या कल्पनेने व्याकुळ होऊन ति या अवघड टोकावरुन खाली उतरली दुसर्‍या दिवशी महाराजांना ही बातमी कळल्यावर त्यांना कळून चुकले की कडा अवघड असूनसुध्दा एक स्त्री तो उतरुन जाऊ शकते तर शत्रू कधीही येथून वर येऊ शकतात या ठिकाणी शिवरयांनी त्वरित बुरुज बांधून घेतला व बुरुजास हिरकणी हे नाव दिले.

अशा या अभेद्य किल्ल्याचे दर्शन वृध्दांना व अपंगांना घेता यावे म्हणून येथे रोप-वे बांधण्यात आला आहे. त्यामुळे या किल्ल्यावर वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. किल्ल्यावर निवासासाठी राज्य पर्यटन महामंडळाने विश्रामगृह आहे.

शिवाजी महाराजांचे जीवन कसे असेल ते या रायगडावर गेल्यावर अनुभवायास मिळते जन्मभर खस्ता खाऊन लोकांच्या लाडक्या राजाने आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापून दिले त्याला मानवंदना देण्यासाठी प्रत्येकाने या तिर्थस्थानास भेट द्यायला हवी.

जायचे कसे? - मुंबई पासुन २०३ कि.मी. वर पुण्याहुन १२६ कि.मी. वर असलेल्या रायगडाला जाण्यासाठी दोन्ही शहरांपासून बससेवा उपलब्ध आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर असलेले महाड हे गाव रायगड पासुन २४ कि.मी. वर आहे येथुन नियमीत बससेवा उपलब्ध आहे.

For more http://www.abhayaranya.com

नागोठणे - एक ऐतिहासिक स्थळ

शिलाहार काळातील हे प्रसिध्द बंदर रायगड जिल्ह्याच्या मध्यभागी असुन दाट डोंगरांनी वेढलेले आहे. पूर्वी या बंदरातून मुंबईपर्यंत मिठ, मासे व तांदुळ यांची वाहतुक चालत असे. तसेच इ.स. १९१४ पसुन काही वर्ष या बंदरात स्टीम बोटींद्वारे वाहतूक चालत असे. सध्या हे बंदर गाळाने भरल्यामूळे आता जलवाह्तूक होत नाही.

विस हजार लोकसंख्येच्या या शहरास फार जुना ऐतिहासीक वारसा आहे. शिलाहार राजे नागार्जुन याच्या काळात संपन्न अशा कोकणास उतरती कळा लागली व भाऊबंदकीमूळे कदंब नुपती द्वितीय गुहल्लदेव याने कोकणावर हल्ला केला व जनतेचा छ्ळ सुरु केला. पुढे नागार्जुनाचा पुत्र अनंतदेव याने संकटातून देशाची मुक्तता केली. अनंतदेवाचा उल्लेख असलेला फक्त एक ताम्रपट सापडला आहे. ज्यात त्याने आपल्या मंत्र्यांना शुर्पारक, चैमुल्य व नागोठणे या बंदरात करमाफी दिल्याचा उल्लेख आहे.

१७९६ साली पेशव्यांनी जेव्हा मानाजीस सरखेली देउन जयसिंग या अनौरस पुत्रास कारभारी म्ह्अणून नेमल्यावर मानाजीच्य आईने जयसिंगास कैदेत टाकले तेव्हा त्याची बायको सखवरबाई हिने नागोठणे येथे स्थायिक होउन आंग्रेंविरुध्द बंड पुकारले. व तिच्यामुळेच जयसिंगास पुण्याकडे जाऊन पेशव्यांची मदत घेणे शक्य झाले.

सन १५३० पर्यंत नागोठण्यास गुजरातची सत्ता होती. सुलतानाचा पराभव करुन हे शहर पोर्तुगिजांनी जिंकले व नंतर त्याचा ताबा निजामाकडे गेला , यानंतर मुघलांच्या ताब्यातून दहा वर्षांनी शिवरायांनी नागोठणे त्यांच्या राज्यात आणले.

१५८० साली काझी अल्लाऊद्दीन ने बांधलेला अंबा नदीवरील पुल हे नागोठण्याचे प्रमुख आकर्षण आहे. चुना व अंड्याचे मिश्रण एकत्र करुन बनवलेला हा पुल १९८९ च्या महाभयंकर प्रलयाचे व इतर अनेक छोट्या मोठ्या पुरांचे तडाखे सोसुनसुध्दा हा पुल आजही दिमाखात उभा आहे.

आज हे शहर औद्योगिकीकरणात आपली ऐतिहासीकता गमावून बसले असले तरी शहराच्या आजुबाजुचा परिसर आजही आपली निसर्गरम्यता शाबुत ठेवुन आहे.

येथून चार कि.मी. अंतरावर असलेल्या सुकेळी खिंडीत असलेला बारमाही धबधबा पावसाळ्यात आपल्या आक्रमकतेने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो व त्यांना थांबावयास भाग पाडतो. शहराचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचे जाग्रुत देवस्थान, तीन तळ्यांच्या मधोमध असलेले हे भव्य मंदिर पाहण्यासाठी अनेक लोक येत असतात. शहराच्या आजुबाजुस अनेक सौंदर्यदृश्ये असल्याने येथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा होत असते.

गणेशमुर्तींची जागतीक बाजारपेठ असलेले पेण शहर येथुन फक्त २९ कि.मी. वर आहे. तसेच अष्टविनायक क्षेत्र बल्लाळेश्वराचे पाली येथुन फक्त १० कि.मी. वर आहे.

नागोठणे येथे निवासाची सोय एस.टी.स्टन्ड समोर असलेल्य आनंद लौज येथे होवू शकते. मुंबईहून १०० कि.मी. व पुण्याहून १२५ कि.मी. असलेले हे शहरवजा गाव एक दिवसात पाहुन होण्यासारखे आहे. थेट बसेस उपलब्ध आहेत.

For more http://www.abhayaranya.com